बॉलिवूडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student of the Year) सह काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारलेल्या एका अभिनेत्याला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
चेन्नई कस्टम्स आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) संयुक्त कारवाईत, त्याच्याकडून ३.५ किलो कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे किंमत ३५ कोटी रुपये आहे.
एअर इंटेलिजेंस युनिटकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रविवारी सकाळी या अभिनेत्याला विमानतळावर थांबवण्यात आले. त्याच्या चेक-इन केलेल्या सामानाच्या ट्रॉलीमध्ये बनावट कंटेनरात लपवलेली पांढरी पावडर आढळली, जी तपासणीनंतर कोकेन असल्याचे सिद्ध झाली. चौकशीत त्याने सांगितले की, ट्रॉली कंबोडियाहून सिंगापूरमार्गे चेन्नईला पोहोचली असून, ती अज्ञात व्यक्तींनी त्याला सोपवली होती.
सध्या DRI या ड्रग्ज नेटवर्कची सखोल चौकशी करत आहे. अधिकारी असा अंदाज व्यक्त करत आहेत की ही खेप मुंबई किंवा दिल्लीतील मोठ्या ड्रग नेटवर्कपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात होता. अभिनेता यापूर्वी ड्रग्ज तस्करीशी संबंधित होता का, यासाठी त्याच्या मागील प्रवासाची नोंद तपासली जात आहे, मात्र त्याचे नाव अद्याप उघड झालेले नाही.