दसरा मेळावा;शिवसेनेचा मेळावा यंदा 'या' ठिकाणी होणार

30 Sep 2025 18:05:48
 
Dussehra melava Shiv Sena
 Image Source:(Internet)
मुंबई :
शिवसेनेच्या दसऱ्याच्या मेळाव्याबाबत (Dussehra melava) मोठा बदल करण्यात आला आहे. यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावमधील नेस्को सेंटर मध्ये आयोजित केला जाणार आहे. यावेळी फक्त मुंबई-महानगर परिसरातील शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
 
मेळाव्याचा उद्देश मुख्यतः पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी निधी संकलन हा असल्याचे सांगितले जात आहे. राज्यभरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार नाहीत, तर ते थेट पूरग्रस्त भागात मदतीसाठी धावणार आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
पिकं आणि शेतकऱ्यांचे नुकसान गंभीर-
एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत सांगितले, “राज्यात अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या अंदाजानुसार सुमारे 60 लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील दोन-तीन दिवसात संपूर्ण आकडे मिळाल्यानंतर त्यानुसार ठोस निर्णय घेण्यात येईल.”
 
त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना मदत करताना कुठलीही अटी, नियम किंवा शर्थी अवलंबून राहणार नाहीत. ज्या भागात आपत्ती आहे, त्या भागात शिवसेना आणि स्थानिक कार्यकर्ते तत्परतेने मदतीसाठी काम करतील.
 
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मार्गदर्शन-
एकनाथ शिंदे म्हणाले, “जिथे आपत्ती तिथे मदत ही आमची प्राथमिकता आहे. कार्यकर्त्यांनी दसऱ्याच्या मेळाव्यासाठी मुंबईत न बोलता, शेतकऱ्यांच्या घरांवर, बांधावर जाऊन मदत पोहोचवावी, ही आमची सूचना आहे. हे खऱ्या अर्थाने समाजकारणाची प्राथमिकता आहे, तर राजकारण त्यापुढे येते.”
Powered By Sangraha 9.0