केंद्र सरकार महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर देणार ५०% अनुदान!

30 Sep 2025 11:45:49
 
women farmers
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
शेती क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आता महिला शेतकऱ्यांना (Women farmers) ट्रॅक्टर खरेदी करताना थेट ५० टक्के अनुदान मिळणार आहे.
 
महिलांसाठी आतापर्यंत लाडकी बहिण, अस्मिता, विधवा पेन्शन अशा विविध कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र या वेळी थेट शेती व्यवसायाशी संबंधित आणि महिलांना सबळ करणारी योजना जाहीर करण्यात आली आहे.
 
शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन क्षमता वाढते तसेच मेहनतही कमी होते. पण ट्रॅक्टरसारखी महागडी यंत्रसामग्री विकत घेणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडत नाही. विशेषतः महिला शेतकऱ्यांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरते. त्यामुळे केंद्र सरकारने हा दिलासा देत महिलांना ५० टक्के अनुदानाची तरतूद केली आहे.
 
ही सुविधा “सब-मिशन ऑन अ‍ॅग्रिकल्चरल मेकॅनायझेशन” (SAMA) या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. या योजनेत पुरुष शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान मिळेल, तर महिलांसाठी विशेष सवलत म्हणून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
 
तज्ञांच्या मते, या निर्णयामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून उत्पादन क्षमता वाढेल आणि शेती व्यवसाय अधिक फायदेशीर ठरेल.
Powered By Sangraha 9.0