(Image Source-Internet)
नागपूर :
अंडरवर्ल्डमधील चर्चित नाव असलेला अरुण गवळी (Arun Gawli) तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर बुधवारी त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मुक्तता करण्यात आली.
२००७ मध्ये घाटकोपरमधील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेली १७ वर्षे तो नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होता. या काळात त्याने अनेकदा जामिनासाठी अर्ज केला, मात्र प्रत्येक वेळी त्याला निराशा हात लागली. अखेर वयोमानाचा विचार करून (सध्या वय ७६ वर्षे) सुप्रीम कोर्टाने त्याला दिलासा दिला.
आज सकाळी त्याची सुटका गुप्ततेने करण्यात आली. माध्यमांच्या नजरेत येऊ नये यासाठी कारागृह प्रशासनाने मागील दरवाजातून त्याला बाहेर काढले. तुरुंगाबाहेर आल्यानंतरचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकले आहेत.
पांढरा शर्ट-पँट, पांढरी टोपी आणि चप्पल या नेहमीच्या पोशाखात गवळी दिसला. त्याच्या सुटकेनंतर पुन्हा एकदा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याचं नाव गाजू लागलं आहे.