(Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा शेवट सरकारने जीआर काढून केल्यानंतर आता ओबीसी (OBC) समाजामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सरकारने जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मान्य केल्याने ओबीसी नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लक्ष्मण हाकेंचे थेट आरोप-
या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबियांवर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. हाके म्हणाले, “ओबीसींचं आरक्षण संपवण्यामागे पवार घराण्याचा हात आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा दिला. एवढंच नाही, तर रोहित पवारांचा आयटी सेल हे आंदोलन चालवत होता, हे ओबीसी समाज जाणतो.”
त्यांनी अजून पुढे सांगितले की, “या बेकायदेशीर आंदोलनाला शरद पवारांनीच उभं केलं. सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनावणे यांचा यात सहभाग होता. अजित पवार गटातील आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी यांनी देखील जरांगे आंदोलनाला पाठिंबा दिला. गाड्या कोण पुरवत होतं, पत्रकार परिषद कोण घेत होतं, याबाबत राज्यातील ओबीसी समाज सजग आहे.”
ओबीसींच्या हक्कांवर गदा?
हाके यांनी आणखी आरोप करताना म्हटले की, “सरकारचा जीआर हा बेकायदेशीर आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा न्यायालयाने नाकारला आहे. तरीसुद्धा या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणावर थेट धोका निर्माण झाला असून, पवार कुटुंबियांनीच ओबीसींचे हक्क हिरावले आहेत.”
आंदोलनाची चाहूल-
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला लाभ होणार असला, तरी ओबीसींच्या हक्कांवर गदा आल्याचे चित्र आहे. यामुळे पुढील काही दिवसांत ओबीसी समाज मोठ्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.