- महामेट्रोच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे नागपूरची जागतिक पातळीवर ओळख
(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर (Nagpur) महामेट्रोने कामठी रोडवर उभारलेला जगातला सर्वात लांब डबल डेकर फ्लायओव्हर आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. या अभूतपूर्व यशामुळे नागपूर शहराला जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा असलेल्या शहरांमध्ये गणना मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामगिरी येथे झालेल्या समारंभात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे भारतातील प्रतिनिधी स्वप्निल डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रवण हार्डिकर यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.
या डबल डेकर वायाडक्टची एकूण लांबी 5.637 किलोमीटर असून, तो एकाच कॉलमवर उभारण्यात आला आहे. या फ्लायओव्हरवर वरच्या टप्प्यावर मेट्रो मार्ग तर खालच्या टप्प्यावर राष्ट्रीय महामार्ग आहे. हे स्थापत्य अभियांत्रिकीचे एक अद्वितीय उदाहरण मानले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महामेट्रोच्या या ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन करत सांगितले की, "या यशामुळे नागपूर शहराची ओळख आता एका जागतिक दर्जाच्या शहराप्रमाणे झाली आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे."
याआधी छत्रपती नगरमध्ये 3.2 किमी लांबीचा डबल डेकर फ्लायओव्हर बनवण्यात आला होता, जो देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला होता. मात्र, कामठी रोडवरील हा नवीन वायाडक्ट लांबीच्या दृष्टीने त्याही पुढे गेला आहे.
महामेट्रोने अल्पावधीत केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे नागपूरचे नाव आता जागतिक स्तरावर घुमू लागले आहे.