(Image Source-Internet)
लखनौ:
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी (Yogi) आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक दिवस सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीसाठी अडकून पडलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित होणार असून त्याची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, हा चित्रपट आता १९ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आधी तो १ ऑगस्टला रिलीज होणार होता, पण प्रमाणपत्रासाठी विलंब झाल्याने चित्रपट पुढे ढकलावा लागला. त्यामुळे निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
इंस्टाग्रामवर निर्मात्यांनी पोस्ट करत लिहिलं – “संघर्ष मोठा होता, पण आमचा निर्धार अजून मोठा होता. आता अखेर या प्रवासाचा विजय साजरा करण्याची वेळ आली आहे.”
या बायोपिकमध्ये दिनेश लाल यादव, परेश रावल, अजय मेंगी, पवन मल्होत्रा, राजेश खट्टर, गरिमा विक्रांत सिंह आणि सरवर आहुजा असे अनुभवी कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र गौतम यांनी केले असून तो शंतनू गुप्ता यांच्या चर्चित पुस्तक ‘द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ वर आधारित आहे. संगीत आणि पार्श्वसंगीतासाठी प्रसिद्ध मीत ब्रदर्स यांनी काम केले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय आणि वैयक्तिक प्रवासावर प्रकाश टाकणारी ही कहाणी आता १९ सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.