Image Source:(Internet)
पुणे:
हुंड्याच्या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने खूप गंभीर निर्णय दिला आहे. न्यायालयाने वैष्णवीच्या सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचे जामीन अर्ज नाकारले आहेत.
न्यायालयाचे कठोर निरीक्षण-
अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयात म्हटले.हुंडाबळी हा समाजाला लागलेला मोठा कलंक आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणाच्याही दबावाशिवाय अशा टोकाच्या निर्णयावर पोहोचू शकत नाही. आरोपींवर कट रचणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पुरावे नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप आहेत. जामीन दिल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतात किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतात. पीडितेच्या हक्कासोबत समाजहित लक्षात घेणे आवश्यक आहे."
वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) हिने हुंडा व जमीन खरेदीसंबंधी जाचामुळे आत्महत्येची निवड केली होती. याप्रकरणी लता राजेंद्र हगवणे (सासू, वय ५४), करिश्मा राजेंद्र हगवणे (नणंद, वय २१), नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५) यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद-
विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि तक्रारदारांचे वकील शिवम निंबाळकर यांनी जामीनावर तीव्र विरोध केला. त्यांनी न्यायालयात माहिती सादर केली की:
शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या शरीरावर ३० जखमा असून ११ ते १६ मे दरम्यान तिचा क्रूर छळ झाल्याचे स्पष्ट होते.
आरोपी नीलेश चव्हाण हुंड्याच्या प्रत्येक चर्चेत सहभागी होता आणि शशांक व करिश्माच्या मोबाईलमधील सीमकार्ड नष्ट केले.
कॉल डिटेल्स व आर्थिक व्यवहारातून करिश्मा आणि नीलेश यांच्यातील निकट संबंध दिसून येतात.
कोर्टाच्या या निर्णयामुळे हुंडाबळीविरोधात समाजात जागरूकता वाढण्यास मदत होईल असा संदेशही न्यायालयातून दिला गेला.