केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते कामठीतील रमानगर फ्लायओव्हरचे उद्घाटन

29 Sep 2025 16:30:23
 
Nitin Gadkari
 Image Source:(Internet)
नागपूर :
कामठी शहर व ग्रामीण भागातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या रमानगर फ्लायओव्हरचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, राज्य मंत्री आशीष जायसवाल आणि माजी आमदार टेकचंद सावरकर यांची विशेष उपस्थिती होती.
 
कामठी शहर, ग्रामीण परिसर आणि आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त ड्रॅगन पॅलेस मंदिराला जोडणारा हा पूल विकासाचा नवा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ७), नागपूर–कोलकाता महामार्ग (क्रमांक ५३) आणि कामठी–कुही राज्य महामार्ग (क्रमांक २४७) यांचा परस्परांशी थेट संपर्क साधला जाणार आहे.
 
फ्लायओव्हरमुळे नागपूर, कामठी शहर व कामठी ग्रामीण भागातील वाहनवाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषत: घोरपड येथील ड्रॅगन पॅलेसला जाणे अधिक सोयीचे होणार असून जड वाहनांची रहदारीही सुरळीत पार पडणार आहे, असे गडकरींनी सांगितले.
 
या प्रसंगी गडकरी आणि बावनकुळे यांनी कामठी शहराचा विकास हा प्रमुख ध्येय असल्याचे नमूद केले. स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक कामठी उभारण्याचे स्वप्न त्यांनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले की, सुलेखा कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेससारख्या प्रकल्पांमुळे कामठीला विशेष ओळख मिळवून दिली असून त्यांच्या योगदानामुळे शहराच्या विकासाला गती मिळाली आहे.
 
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0