Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील भीषण पावसाळा व पुरस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधानमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्यपालांना पत्र लिहून विधानसभेचे तात्काळ विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली आहे.
वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले की, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडले असून त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यात तब्बल ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतीचे मातीसकट नुकसान झाले, जनावरे वाहून गेली, घरे कोसळली तर दुर्दैवाने अनेकांनी प्राणही गमावले आहेत. वीज खांब व तारांवर परिणाम झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर, रस्ते वाहून गेल्याने गाव-शहरांतील संपर्क तुटला आहे.
कर्जमाफी व मदतीची मागणी-
वडेट्टीवार यांनी पत्रात अधोरेखित केले आहे की दूषित पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून राज्याला तत्काळ ‘आपत्तीग्रस्त’ घोषित करून शेतकरी व नागरिकांसाठी मदत व पुनर्वसन पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळला जावा, तसेच पिके व संपत्तीचे योग्य पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेष अधिवेशनाची गरज-
या गंभीर परिस्थितीवर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी राज्यपालांना केले आहे.