दसरा मेळावा रद्द करून खर्च पूरग्रस्तांसाठी वापरा; उद्धव ठाकरेंना भाजप नेत्याची मागणी

29 Sep 2025 10:24:52
 
BJP Keshav Upadhyay demands Uddhav Thackeray
 Image Source:(Internet)
औरंगाबाद :
मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, शेतजमीन आणि पिके वाहून गेल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र आता भाजपानेही ठाकरे यांना प्रत्युत्तर देत दसरा मेळाव्यावरून थेट सवाल उपस्थित केला आहे.
 
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे की, "मराठवाड्यातील भीषण पुरपरिस्थितीमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यांचा दौरा करून दुःख व्यक्त केले, हे ठीक आहे. पण केवळ भावना व्यक्त करून काही होणार नाही. आता प्रत्यक्ष कृती दाखवण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च पूरग्रस्तांसाठी दिला, तर त्याला खरी संवेदना म्हणता येईल."
 
याचबरोबर त्यांनी ठाकरे यांच्यावर उपरोधिक टीकास्त्र सोडले. "मुख्यमंत्री असताना काही केले नाही, घरातच बसून राहिलात. आता तरी प्रायश्चित्त म्हणून मेळाव्याचा पैसा पूरग्रस्तांना द्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात दसरा मेळाव्यात विचारांची उधळण व्हायची. पण आज तिथे फक्त 'मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला' या टेपाचं रिपीटिंग होतं. लाखो रुपयांचा खर्च करून कार्यकर्त्यांना त्रास देण्यात काय अर्थ आहे?" असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवताना म्हटले होते की, "भाजपाला प्रशासन चालवणं जमतच नाही. निवडणुका असल्या की पंतप्रधान बिहारला जातात, तिथे कोट्यवधी रुपयांची मदत जाहीर करतात. पण महाराष्ट्रात शेतकरी संकटात असताना इथे येण्याची फुरसत नाही. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, पण फक्त प्रस्ताव पाठवा असं सांगण्यात आलं. समोर उघड दिसतंय तेव्हा प्रस्ताव कसला पाठवायचा?"
 
मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे उद्धव ठाकरेंची टीका आणि भाजपाची पलटवार यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दसरा मेळावा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
Powered By Sangraha 9.0