मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना तातडीची मदत : अजित पवार

26 Sep 2025 15:42:01
 
Ajit Pawar
 Image Source:(Internet)
पुणे :
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटात आले आहेत. मराठवाडा (Marathwada) आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत पूरग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत जाहीर केली.
 
उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार घरात पाणी शिरलेल्या प्रत्येक कुटुंबाला तातडीने पाच हजार रुपये मदत दिली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ पुरवले जाणार आहेत. पाण्यामुळे धान्य नष्ट झाल्यामुळे प्रशासनाने शाळा आणि कार्यालये आश्रयकेंद्र म्हणून उघडली आहेत.
 
अजित पवारांनी सांगितले की मिलिटरी, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन एकत्र काम करून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक अधिकारी रात्रंदिवस मदत कार्यात गुंतले आहेत आणि तातडीच्या गरजा पूर्ण करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांनी मान्य केले की, दिलेले धान्य काही कुटुंबांसाठी पुरेसे नसले तरी, अधिक अन्नधान्य आणि मदत कशी पुरवता येईल, यासाठी ते मुख्यमंत्र्यांसह चर्चा करत आहेत.
 
अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी पत्र पाठवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली असून, केंद्राकडून मदत मिळाल्यास पूरस्थितीवर अधिक प्रभावी उपाय करता येतील, असा उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे.
 
हवामान खात्याने २७, २८ आणि २९ सप्टेंबरसाठी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अजित पवार यांनी सोलापूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा दौरा करून लोकांना सावध राहण्याचे सुचवले आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0