Image Source:(Internet)
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी (Nandani) मठ संस्थानात माधुरी हत्तीणीच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेल्या उच्चाधिकार समितीसमोर (HPC) 25 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत वनतारा संस्था आणि नांदणी मठ संस्थान यांना 6 ऑक्टोबरपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
हत्तीणीसाठी विशेष पुनर्वसन केंद्र-
नांदणी मठ संस्थानाने पुनर्वसनासाठी सहा एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी हत्तीणीसाठी उपचार, सेवा आणि पुनर्वसन केंद्र उभारण्याची जबाबदारी वनतारा संस्थेने स्वीकारली आहे. तज्ञ डॉक्टर व आर्किटेक्ट यांनी जागेची पाहणी करून ती माधुरीसाठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले. सुनावणीत प्राथमिक आराखडाही सादर करण्यात आला.
समितीचा स्पष्ट निर्देश-
उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांनी हत्तीणीचे आरोग्य हा निर्णयप्रक्रियेचा मुख्य मुद्दा राहील, असे स्पष्ट केले. आराखड्यात परवानग्या, बांधकामाची मुदत व इतर सर्व तपशील असणे आवश्यक आहे. पेटाला (PETA) 10 ऑक्टोबरपर्यंत आपली भूमिका मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी सायं. 7 वाजता होणार आहे.
भक्तीपेक्षा पुनर्वसनाला प्राधान्य-
सुनावणीदरम्यान मठ संस्थानने, चातुर्मास काळात भक्तांना माधुरीसोबत दर्शनाची संधी मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र समितीने केंद्र उभारणी व हत्तीणीच्या सुरक्षित पुनर्वसनावर अधिक भर दिला.
घरवापसीचा मार्ग मोकळा-
माधुरीच्या स्थलांतरावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आणि वाद सुरू होते. मात्र आता सुनावणीनंतर नांदणीत तिच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नांदणीकरांच्या अपेक्षांप्रमाणे माधुरीच्या कायमस्वरूपी परतीचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.