Image Source:(Internet)
महाराष्ट्रात (Maharashtra) यंदा पावसाने हाहाकार माजवला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा सतत इशारा हवामान विभागाने दिला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांत यलो अलर्ट लागला आहे. विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे व विजांचा कडकडाट यासह पावसाची शक्यता आहे.
नागपूर हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीणकुमार म्हणाले की, “उत्तर ओडिशा व वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात पुढील तीन-चार दिवस पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. उद्या, शुक्रवारी गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट राहील.”
मध्य महाराष्ट्र आणि कोकणाची परिस्थिती
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच रत्नागिरी व रायगडमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या इतर भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, शुक्रवार व शनिवारी राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाचा धोका आहे.
पावसाचा धोका कायम-
२५ ते २९ सप्टेंबर दरम्यान राज्यभर पावसाचा इशारा कायम राहणार आहे. विशेषत: २७ सप्टेंबरला मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि पिकांचे नुकसान-
मराठवाडा भागात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तसेच नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
यंदा जास्त पाऊस पडण्याचं कारण-
हवामान तज्ज्ञ एस. जी. सानप म्हणाले, “बंगालच्या उपसागरात आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीजवळ दोन कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली, जी पश्चिमेकडे सरकताना मराठवाडा व विदर्भातून गेली. त्यामुळे या भागांत मुसळधार पाऊस पडला. सामान्यत: ही यंत्रणा उपसागराच्या उत्तरेकडील भागात तयार झाली तर मध्य भारतात पाऊस पडतो, परंतु यंदा क्षेत्रे मध्यभागी तयार झाली असल्याने महाराष्ट्रात, विशेषत: मराठवाडा व विदर्भात जास्त पाऊस झाला आहे.”