Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 साली होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा (Board exams) दरम्यानच्या तात्पुरत्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. अंदाजे ४५ लाख विद्यार्थी या परीक्षेत बसणार असून, भारतासह २६ परदेशी केंद्रांवर देखील परीक्षा आयोजित केली जाणार आहेत.
दहावीच्या परीक्षा-
सीबीएसईच्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, 10वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होऊन 6 मार्च 2026 पर्यंत चालतील. या कालावधीत विद्यार्थ्यांचे भाषा विषय, मुख्य विषय तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातील.
बारावीच्या परीक्षा-
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होतील आणि 9 एप्रिल 2026 पर्यंत चालतील. या परीक्षेत एकाच शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिका दिल्या जातील, आणि परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होईल.
तात्पुरत्या तारखा; अंतिम वेळापत्रक नंतर जाहीर-
सीबीएसईने स्पष्ट केले आहे की या तारखा तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांची अंतिम यादी सादर केल्यानंतरच अधिकृत वेळापत्रक प्रकाशित केले जाईल. प्राथमिक तारखा विद्यार्थ्यांना आणि पालकांना नियोजनासाठी मदत करतील.
बोर्डाच्या मते, वेळेवर निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षांचे वेळापत्रक नियोजनपूर्वक ठरवण्यात आले आहे. त्यामुळे निकाल वेळेत मिळाल्याने पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही.