लातूरमधील निलंगा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; ग्रामस्थांमध्ये किल्लारीसारख्या भीषण घटनेची भीती

25 Sep 2025 11:50:11
 
earthquake Nilanga taluka
Image Source:(Internet) 
निलंगा (लातूर):
निलंगा (Nilanga) तालुक्यातील कासार सिरसी परिसरात बुधवारी रात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. रात्री सुमारे ९.२५ वाजता मौजे हासोरी बु., हासोरी खुर्द, हरीजवळगा, उस्तुरी आणि बडूर गाव परिसरात जमिनीतून गूढ आवाजासह दोन हलके धक्के बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
 
धक्के बसताच नागरिक घराबाहेर धावले. अचानक जमिनीचा आवाज आणि हलकासा कंपन जाणवल्याने लोकांच्या मनात 1993 च्या किल्लारी भूकंपाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. याआधीही या भागात असे अनुभव वारंवार आले असल्यामुळे पुढे गंभीर आपत्ती ओढवेल का, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
 
दरम्यान, या घटनेची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली येथे देण्यात आली. तपासणीत सदर धक्क्यांची नोंद भूकंप मापन केंद्रात झालेली नसल्याचे कळविण्यात आले. सिस्मोलॉजिकल डेटा तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 
प्रशासनाने नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0