भारताच्या कसोटी संघात उपकर्णधार बदल; जसप्रीत बुमराहला विश्रांतीची शक्यता, 'या' क्रिकेटरला संधी !

25 Sep 2025 20:03:07
 
Jasprit Bumrah
 Image Source:(Internet)
 
भारत (India) आणि वेस्ट इंडिज यांच्यात २ ऑक्टोबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आशिया चषकात खेळत असलेला शुभमन गिल २८ सप्टेंबरला फायनल खेळून अहमदाबादमध्ये संघात सामील होणार आहे. घरच्या मैदानावर त्याचे हे पहिले कसोटी सामन्याचे पदार्पण असेल.
जसप्रीत बुमराह संघात असला तरी त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाली नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीला त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंग्लंड दौऱ्यावर बुमराहने पाच पैकी तीन सामन्यात भाग घेतला होता, आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत करुण नायर आणि रिषभ पंत खेळणार नाहीत. करुण फॉर्ममध्ये नसल्यामुळे संघाबाहेर राहिला तर रिषभ दुखापतीमुळे अनुपस्थित राहणार आहे. त्यामुळं देवदत्त पडिक्कलला कसोटी संघात पुनरागमन मिळाले आहे, तर ध्रुव जुरेल याला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पहिली संधी मिळाली आहे. एन. जगदीशन आणि साई सुदर्शन संघात आपले स्थान टिकवून ठेवले आहेत.
उपकर्णधारपद रवींद्र जडेजाला दिले गेले आहे. माजी क्रिकेटपटू अजित आगरकर म्हणाले, “रिषभ पंत अजून पुर्णपणे बरा झालेला नाही. पुढील मालिकेपूर्वी तो पुर्णपणे फिट होईल, अशी अपेक्षा असल्याने रवींद्र जडेजाला उपकर्णधार म्हणून निवडले गेले आहे.”
रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ८५ सामन्यांत ३८८६ धावा करत असून, सरासरी ३७.७२ आहे. त्यात ५ शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १७५ असून, त्याच्याकडे ३३० विकेट्स आहेत.
पहिली कसोटी - २ ते ६ ऑक्टोबर, अहमदाबाद
दुसरी कसोटी - १० ते १४ ऑक्टोबर, नवी दिल्ली
Powered By Sangraha 9.0