गॅस सिलेंडर अपघातावर मिळेल लाखोंची नुकसान भरपाई; जाणून घ्या प्रक्रिया

25 Sep 2025 20:04:17
 
Compensation Gas cylinder
 Image Source:(Internet)
नागपूर:
ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी पूर्वी लाकडी चुलींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होते. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आणि गरजू महिलांना मोफत एलपीजी गॅस (Gas) कनेक्शन उपलब्ध करून दिले. अलीकडेच या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून देशभरातील आणखी 25 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत.
 
उज्ज्वला योजनेमुळे एलपीजी गॅसचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, महिलांचे आरोग्य सुरक्षित झाले आहे. मात्र, गॅस सिलेंडर सुरक्षित असले तरी काही वेळा तांत्रिक बिघाड किंवा निष्काळजीपणामुळे सिलेंडरचा स्फोट होतो. अशा अपघातात गंभीर जिवितहानी होऊ शकते.
 
गॅस सिलेंडर अपघातासाठी नुकसान भरपाई-
एलपीजी गॅस सिलेंडरसाठी सार्वजनिक विमा उपलब्ध आहे, जो थेट ग्राहकांच्या नावावर नसून तेल कंपन्यांकडून काढला जातो. यासाठी:
जिवितहानी झाल्यास: प्रति व्यक्ती 6 लाख रुपये
वैद्यकीय खर्चासाठी: प्रति व्यक्ती 2 लाख रुपये
एकूण अपघातासाठी: 30 लाख रुपये पर्यंत
संपत्तीच्या नुकसानीसाठी: 2 लाख रुपये
विमा कव्हर: एका वर्षात जास्तीत जास्त 10 कोटी रुपये
 
नुकसान भरपाईसाठी प्रक्रिया-
सिलेंडर स्फोट झाल्यास ग्राहकांनी तात्काळ आपल्या गॅस वितरकाला माहिती द्यावी. नंतर पुढील प्रक्रिया तेल कंपनी व विमा कंपनीद्वारे केली जाते. ग्राहकांना थेट विमा कंपनीशी संपर्क साधण्याची गरज नाही. फक्त मृत्यू प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय खर्चाची बिले वितरकाकडे जमा करावी लागतात. वितरक व कंपनीद्वारे नुकसान भरपाईची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते.
दरम्यान गॅस वापरताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आणि अपघात झाल्यास तातडीने वितरकाला कळवणे अत्यंत आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0