सौरव गांगुली पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी

    24-Sep-2025
Total Views |
 
Sourav Ganguly
 Image Source:(Internet)
कोलकाता :
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
 
गांगुली सहा वर्षांनंतर पुन्हा राज्य क्रिकेट संघटनेत परतले आहेत. याआधी 2015 ते 2019 या कालावधीत त्यांनी CAB अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्षपद सांभाळले. यावेळी बबलू कोले (सचिव), मदन मोहन घोष (संयुक्त सचिव), संजय दास (कोषाध्यक्ष) आणि अनु दत्ता (उपाध्यक्ष) अशी संपूर्ण टीम बिनविरोध निवडून आली आहे.
 
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुली यांनी ईडन गार्डन्सची प्रेक्षक क्षमता वाढवण्याचे लक्ष्य ठेवले असून ती सुमारे एक लाखापर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील सामन्यांचे आयोजन कोलकात्यात करण्याचे प्राधान्य असेल.
 
गांगुली यांनी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याची तयारी ही त्यांची पहिली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या डे-नाईट कसोटी नंतर ईडनवर होणारा हा पहिला कसोटी सामना ठरणार आहे.
 
बीसीसीआय अध्यक्ष म्हणून गांगुली यांनी गुलाबी चेंडूने डे-नाईट कसोटीची परंपरा भारतात सुरू केली होती. आता पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर विराजमान होताना गांगुली यांनी आशा व्यक्त केली की, ईडन गार्डन्सवर भारतीय आणि दक्षिण आफ्रिकन संघ उत्कृष्ट सुविधा अनुभवतील. तसेच, ते लवकरच बीसीसीआयच्या नव्या टीमसोबतही चर्चा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.