Image Source:(Internet)
नागपूर :
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर (Hookah parlor) नागपूर क्राइम ब्रांचने छापा टाकला. या कारवाईत पार्लरचा मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात आला असून मालक फरार झाला आहे. पोलिसांनी पार्लरमधून तब्बल ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात हुक्का पॉट व सुगंधी तंबाखूचा समावेश आहे.
सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरभरात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. या दरम्यान क्राइम ब्रांच युनिट-२ ला माहिती मिळाली की, धर्मपेठ परिसरातील ‘सैफरॉन कॅफे’मध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून पार्लर मॅनेजर हिमांशू पटेल याला अटक केली.
चौकशीत समोर आले की, या कॅफेचा मालक मोहम्मद सैफ लतीफ नागाणी असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईत ११ हुक्का पॉट, विविध फ्लेवरची तंबाखू आणि अन्य साहित्य असा ३६ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंबाझरी पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या मॅनेजरला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.