Image Source:(Internet)
नवी दिल्ली:
भारतीय सिनेसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे ७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे (National Film Awards) वितरण आज दिल्लीमध्ये पार पडले. बॉलिवूड, साऊथ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील विजेत्यांनी या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारले. या प्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे.
‘नाळ २’ या मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपट’ या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी चित्रपटाचे प्रतिनिधी उमेशकुमार बन्सल उपस्थित होते. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उमेशकुमार बन्सल यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला.
या यशाने मराठी चित्रपटसृष्टीतील बालचित्रपटांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ‘नाळ २’मधील बालकलाकार त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोळके आणि भार्गव जगताप यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले.
चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी याक्कनबी यांनी केले आहे. मुलांच्या भावविश्वावर आधारित या चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल सुधाकर रेड्डी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. चित्रपटाची निर्मिती आटपाट प्रोडक्शन आणि झी स्टुडिओज यांनी केली आहे.
‘नाळ २’ हा चित्रपट १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात जितेंद्र जोशी, श्रीनिवास पोळके, दीप्ती देवी आणि नागराज मंजुळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मूळ चित्रपट ‘नाळ’ (Naal) ला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाल्यानंतर त्याचा दुसरा भाग ‘नाळ २’ प्रदर्शित करण्यात आला.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही मोठी उपलब्धी असून, बालचित्रपटांची गुणवत्ता आणि सामाजिक संदेश यांचा योग्य संगम ‘नाळ २’ चित्रपटातून दिसून आला आहे.