Image Source:(Internet)
राज्यातील हवामान परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील सहा दिवस महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rain) होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील काही दिवसांत बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांत अनेक ठिकाणी ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांतही मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, कोकणातील सर्व जिल्ह्यांत आणि विदर्भातील बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथे हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी घोषणा केली की दिवाळीपूर्वी सर्व बाधित शेतकऱ्यांना शासकीय मदत उपलब्ध करून दिली जाईल.