Image Source:(Internet)
धाराशिव/सोलापूर :
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. तर मंत्री पंकजा मुंडे जालना जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत.
आज सकाळीच अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. नंतर ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोरटी गावात पोहोचले.
निधीची कमतरता भासणार नाही –
यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली. त्यांनी सांगितले, “शेतकऱ्यांनी काळजी करू नये. सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. पंचनामे ड्रोनच्या मदतीने केले जातील. तसेच मदत देताना ६५ मिमी पावसाची अट रद्द करण्यात येईल. निधीची कोणतीही अडचण होणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.
अजित पवारांनी कांदा आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारकडून शक्य तितकी मदत केली जाईल, असेही ते म्हणाले.
पंकजा मुंडेही शेतकऱ्यांच्या बांधावर-
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील गोळेगाव गावाला भेट देणार आहेत. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गावाला मोठा वेढा बसला होता. पुराच्या भीतीने गावातील तब्बल अडीच ते तीन हजार नागरिकांनी मध्यरात्री शेजारच्या लोणी गावात स्थलांतर केले. पंकजा मुंडे गावकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा सविस्तर आढावा घेणार आहेत.
राज्य सरकारच्या या हालचालींमुळे अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.