Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
नवरात्रीच्या (Navratri) शुभ मुहूर्तावर मोदी सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तब्बल २५ लाख नवीन कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १०६ दशलक्षांवर पोहोचणार आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी सांगितले की, प्रत्येक नवीन कनेक्शनसाठी सरकारकडून सुमारे २,०५० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यात एक मोफत एलपीजी सिलेंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि इतर उपकरणांचा समावेश असेल. पुरी यांनी सांगितले की, ही योजना महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रतीक असून नवरात्रीच्या निमित्ताने मातांसाठी आणि भगिनींसाठी मोदी सरकारकडून दिलेली खास भेट आहे.
सध्या सरकारकडून ३०० रुपयांचे अनुदान दिले जात असून उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना फक्त ५५३ रुपयांत सिलेंडर रिफिल करून घेता येतो. या निर्णयामुळे गरीब आणि गरजू महिलांना स्वच्छ इंधनाचा लाभ मिळणार असून धुरामुक्त स्वयंपाकघराकडे वाटचाल आणखी वेगाने होणार आहे.