Image Source:(Internet)
वॉशिंग्टन :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकत्याच केलेल्या भारतविरोधी आयात शुल्कवाढ आणि एच-१बी व्हिसा शुल्कवाढीच्या निर्णयांनंतर आता त्यांनी गर्भवती महिलांना दिलेला अजब सल्ला चर्चेत आला आहे.
ट्रम्प यांनी गर्भवती महिलांना “पॅरासिटेमॉल (अॅसेटामिनोफेन/टायलेनॉल) चा वारंवार वापर टाळा” असा सल्ला दिला. त्यांच्या मते, या औषधाचा जास्त वापर केल्यास बाळाला ऑटिजमचा धोका संभवतो. ऑटिजम हा मुलांच्या वर्तन आणि सामाजिक संवादावर परिणाम करणारा विकार असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, ट्रम्प यांच्या या विधानाला वैद्यकीय तज्ज्ञ आणि औषधनिर्माण क्षेत्रातील जाणकारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, पॅरासिटेमॉलच्या वापराचा आणि ऑटिजमचा थेट संबंध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. उलट गर्भधारणेदरम्यान ताप, अंगदुखी किंवा डोकेदुखी आल्यास पॅरासिटेमॉल घेण्याचाच सल्ला डॉक्टर देतात.
ट्रम्प यांनी आपले विधान अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या एका अभ्यासावर आधारित असल्याचे म्हटले. त्या अभ्यासात पॅरासिटेमॉलचा अतिरेक आणि ऑटिजममध्ये संभाव्य संबंध दर्शवण्यात आला होता. मात्र जागतिक वैज्ञानिकांनी या निष्कर्षाला अपुरा आणि दिशाभूल करणारा म्हटले आहे.
याच भाषणात ट्रम्प यांनी नवजात शिशूंना दिल्या जाणाऱ्या लसींवरही प्रश्न उपस्थित केले. “प्रत्येक बाळाला जन्मल्यानंतर लगेच हेपेटायटिस-बी लस का द्यावी? ती 12 वर्षांनंतर द्यायला हवी,” असा सवाल त्यांनी केला. इतकेच नव्हे तर लसीतील काही घटकांमुळेही ऑटिजम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
ट्रम्प यांच्या या विधानामुळे अमेरिकेतील वैद्यकीय वर्तुळासह समाजात मोठ्या प्रमाणावर टीकेची लाट उसळली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे दावे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करून आरोग्यधोका वाढवू शकतात.