अहमदाबाद विमान दुर्घटनेवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप; एएआयबीचा अहवाल बेजबाबदार ठरवला

22 Sep 2025 15:08:26
 
Supreme Court
 Image Source:(Internet)
अहमदाबाद :
12 जून 2025 रोजी अहमदाबाद (Ahmedabad) विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा टेकऑफनंतर काही सेकंदांत भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत तब्बल 270 प्रवाशांचा मृत्यू झाला तर केवळ एकच प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला. देशभरात खळबळ उडवणाऱ्या या अपघाताबाबत अजूनही नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
 
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनने याचिका दाखल केली असून स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला थेट नोटीस बजावली. तसेच, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
एएआयबीने अहवालात "इंधनाच्या तुटवड्यामुळे किंवा पायलटच्या चुकीमुळे दुर्घटना घडली असावी" असा केवळ संशय नोंदवला आहे. मात्र, ठोस कारण नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे न्यायालयाने या अहवालाला "बेजबाबदार" ठरवले.
 
वकील प्रशांत भूषण यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर 171 या विमानात अनुभवी पायलट होते. तरीदेखील 100 दिवस उलटूनही अपघाताच्या मूळ कारणांवर काहीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.
 
या भीषण दुर्घटनेत अख्खी कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, अपघाताचे भयावह दृश्य दाखवणारे व्हिडिओदेखील समोर आले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0