Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
देशात जीएसटी (GST) 2.0 अंमलात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र पाठवत नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि सुधारांचा लाभ स्पष्ट केला. त्यांनी म्हटलं की, “या नवरात्रीत जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांना थेट फायदा होईल आणि स्वदेशीचा मंत्र अधिक प्रभावी ठरेल.”
जीएसटीमधील बदलांनुसार आता कररचना अधिक सुलभ झाली आहे. रोजच्या वापरातील वस्तू – जसे की अन्नधान्य, औषधे, साबण, टूथपेस्ट – यांना करमाफी किंवा 5 टक्क्यांच्या दरात ठेवण्यात आलं आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावरचा ताण कमी होणार असून, लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधानांनी आपल्या पत्रात नमूद केलं की, या सुधारणांमुळे घर उभारणं, वाहन घेणं आणि प्रवास करणं सर्वसामान्यांना अधिक स्वस्त होईल. सुधारांचा फायदा शेतकरी, महिला, तरुणाई, मध्यमवर्गीय, छोटे व्यापारी आणि उद्योगांना होणार आहे. यावेळी त्यांनी व्यापारी व दुकानदारांना आवाहन करताना म्हटलं की, “भारतीय कामगार आणि उत्पादकांच्या पाठिशी उभं राहा आणि स्वदेशी वस्तूंचा प्रचार करा.”
मोदींनी यासोबतच गेल्या काही वर्षांत 25 कोटी नागरिक दारिद्र्यरेषेबाहेर आले असल्याचा उल्लेख केला. नवीन जीएसटी प्रणालीमुळे दरवर्षी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा त्यांनी केला.
पत्राच्या अखेरीस पंतप्रधानांनी देशवासियांना स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आणि “आत्मनिर्भर भारत अभियान” पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करत नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.