महाराष्ट्रातील ‘साडेतीन शक्तीपीठे’ : देवी सतीच्या पौराणिक कथेशी निगडीत अद्भुत स्थळे

    22-Sep-2025
Total Views |
 
Goddess Sati
 Image Source:(Internet)
मुंबई:
भारत ही मंदिरांची आणि देवस्थानांची भूमी मानली जाते. महाराष्ट्रात विशेषतः ‘साडेतीन शक्तीपीठे’ म्हणून ओळखली जाणारी चार मंदिरे – तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी – यांना धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे.
 
या शक्तीपीठांबाबतची कथा देवी सती आणि भगवान शंकराच्या पौराणिक तांडवाशी संबंधित आहे. कथेनुसार, राजा दक्षच्या यज्ञात अपमान सहन न करता देवी सतीने आत्मदाह केला. संतप्त शंकराने तांडव नृत्य सुरू केले आणि भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने सतीचे देह छिन्न-विच्छिन्न झाला. सतीचे पडलेली अंगं ज्या ठिकाणी स्थापन झाली, तीच शक्तीपीठे म्हणून ओळखली जातात.
 
तीन पूर्ण शक्तीपीठे-
तुळजापूरची तुळजाभवानी (उस्मानाबाद): महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाणारी तुळजाभवानी भवानी मातेचा अवतार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने दिलेली तलवार त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी प्रसिद्ध आहे.
 
कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई): पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ, जिथे लक्ष्मी आणि विष्णू यांच्याशी संबंधित
कलात्मक रचना पाहायला मिळते.
 
माहूरची रेणुकामाता (नांदेड): परशुरामाची आई रेणुका यांच्याशी निगडित, देवी सतीच्या उजव्या हाताचे स्थान मानले जाते.
 
अर्ध शक्तीपीठ: वणीची सप्तशृंगी देवी-
नाशिक जिल्ह्यातील वणीतील सप्तशृंगी मंदिर हे अर्ध शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते, कारण येथे सतीचे फक्त अर्धे अंग पडल्याचे मानले जाते. सात शिखरांच्या परिसरामुळे देवीला ‘सप्तशृंगी’ असेही संबोधले जाते.
 
सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व-
साडेतीन शक्तीपीठे फक्त धार्मिक स्थळ नाहीत, तर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा भाग आहेत. विशेषतः नवरात्रीसाठी ही मंदिरे भाविकांसाठी केंद्रस्थळ बनतात. या मंदिरांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळते आणि स्थानिक अर्थव्यवस्था सुध्दा सुदृढ होते.
 
महाराष्ट्रातील ही शक्तीपीठे लोकांची श्रद्धा, संस्कृती आणि इतिहास यांचे प्रतीक आहेत. यांचे संरक्षण आणि संवर्धन करून आपण भावी पिढ्यांसाठी ही सांस्कृतिक संपत्ती टिकवून ठेवावी, असे तज्ञ आणि इतिहासप्रेमी सांगतात.