Image Source;(Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसेची संभाव्य युती ही चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर महत्त्वाची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश दिले आहेत.
बदलापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी-अंबरनाथ या भागातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचे आणि समन्वय ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे युतीला हिरवा कंदील दाखवण्यात आला असल्याची चर्चा आता अधिक जोर धरू लागली आहे.
उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन-
बैठकीत उद्धव ठाकरेंनी स्थानिक निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवर भर दिला. पदाधिकाऱ्यांनी शाखा कार्यात समन्वय, संघटनात्मक घडी मजबूत करणे आणि मतदार यादीतील कामकाजावर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
विशेषतः :
प्रत्येक शाखाप्रमुखाने विधानसभा 2024 च्या मतदार यादीवर आधारित तयारी सुरू करावी.
मतदारांची ओळख पटवून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवावा.
संशयित किंवा दुबार मतदार आढळल्यास तक्रार अधिकाऱ्यांकडे करावी.
सोशल मीडिया ग्रुप्स सक्रिय ठेवून नागरिकांशी संवाद साधावा.
65 वर्षांवरील मतदारांशी गटप्रमुखांमार्फत थेट संपर्क ठेवावा.
शिवसेनेच्या कामगिरीवर भर-
बैठकीत ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या कार्यकाळातील महत्त्वाची कामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. यामध्ये कोस्टल रोड, ५०० चौ. फूट घरांना करमाफी, मुबलक पाणीपुरवठा, तसेच कोरोना काळातील प्रयत्नांची जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी, असे सांगण्यात आले.
सामाजिक प्रश्नांवर आघाडी-
कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, गटारे, रस्ते, आरोग्य अशा स्थानिक प्रश्नांवर सक्रिय राहून पक्षाच्या वतीने आंदोलन करावे, अधिकाऱ्यांना पाठपुरावा करावा आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असे निर्देशही उद्धव ठाकरेंनी दिले.
युतीच्या चर्चेला उधाण-
उद्धव ठाकरेंच्या या आदेशानंतर शिवसेना-मनसे युतीला प्रत्यक्षात गती मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही पक्षांनी एकत्रित आढावा घेण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत.