Image Source;(Internet)
मुंबई :
भारत-पाकिस्तान क्रिकेटमध्ये मैदानावरची धडक जितकी तुफानी असते, तितकीच निवृत्त खेळाडूंच्या वक्तव्यांमधूनही रंगतदार वाद निर्माण होत असतात. नुकताच असा एक किस्सा समोर आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
अलीकडे इरफान पठाणने दिलेल्या मुलाखतीत २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यावरील एक प्रसंग सांगितला. त्यामध्ये त्याने आफ्रिदीवर टिका करताना “तो कुत्र्यासारखा भुंकतो” अशी उपमा दिली होती. हा किस्सा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली.
आफ्रिदी म्हणाला, “मी मर्द त्यालाच मानतो जो माझ्यासमोर येऊन बोलेल. मागे बसून बोलणं कोणालाही सोपं आहे. पण खरी ताकद तीच जेव्हा डोळ्याला डोळा भिडवून बोललं जातं.”
या विधानावर इरफान पठाणने देखील थेट पलटवार केला. तो म्हणाला, “भारतावर टीका करणं ही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंची सवयच झाली आहे. मात्र आम्हीही वेळोवेळी त्यांना योग्य उत्तर द्यायलाच तयार असतो.”
या शाब्दिक वादामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून “मर्द” वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.