Image Source;(Internet)
नवी दिल्ली :
अमेरिकेने (US) भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने काही उद्योगांना तातडीचा फटका बसला. अमेरिकेने भारताला धमकी दिली होती की जर त्यांनी त्यांच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर अजून कठोर निर्बंध लागू केले जातील. मात्र भारताने शेवटपर्यंत अमेरिकेच्या दबावाखाली आपली भूमिका टिकवली.
टॅरिफच्या धोके आणि आंतरराष्ट्रीय दबावाच्या काळातही भारताने आर्थिक स्थिरता राखली आणि याचा परिणाम आता जागतिक स्तरावर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी अत्यंत उत्साहवर्धक बातमी आली आहे.
जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सी Ratings & Investment Information Inc. ने भारताची क्रेडिट रेटिंग ‘BBB’ वरून ‘BBB+’ वर नेली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा, टॅरिफच्या परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मूलभूत ताकदीवर विश्वास ठेवून रेटिंग वाढवण्यात आली आहे. रेटिंगनुसार भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहण्यास सक्षम असल्याचे दाखवते.
हा रेटिंग अपग्रेड भारतासाठी तिसऱ्यांदा असून, अर्थ मंत्रालयाने याचे स्वागत केले आहे. मंत्रालयाने म्हटले की, पाच महिन्यांत तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय एजन्सींनी भारताची रेटिंग सुधारली आहे, हे भारताच्या आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या जागतिक पातळीवरील मान्यतेचे प्रतीक आहे.
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने लगेचच पर्यायी मार्गाचा अवलंब केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौरा केला, तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियाचा दौरा करून काही महत्वाचे करार केले. जुलै-ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली. अमेरिकेने यावर दबाव टाकला होता की भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, परंतु भारताने आपल्या आर्थिक गरजा आणि धोरणानुसार निर्णय घेतला.