Image Source;(Internet)
दुबई :
आशिया चषक (Asia Cup) टी-२० स्पर्धेतील थरार आता खऱ्या अर्थाने वाढणार आहे. शनिवारपासून सुपर-फोर फेरीला सुरुवात होणार असून रविवारी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.
शनिवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील लढतीने सुपर-फोरची सुरुवात होईल. या वर्षी ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान होत असलेल्या आशिया चषकात आठ संघ सहभागी झाले होते. भारतीय संघ (सूर्यकुमार यादव कर्णधार) पाकिस्तान, यूएई आणि ओमानसोबत ‘अ’ गटात होता. तर बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ ‘ब’ गटात होते. भारताने गटात अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानी राहिला. श्रीलंका आणि बांगलादेश यांनी ‘ब’ गटातून पुढील फेरी गाठली.
आता नियमानुसार ‘अ’ गटातील पहिल्या दोन संघांमध्ये रविवारी सामना रंगणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दुबईच्या मैदानावर पुन्हा आमनेसामने येणार आहेत. आधीच्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून सहज विजय मिळवला होता. मात्र त्या सामन्यापेक्षा मैदानाबाहेरील प्रसंगांनी अधिक चर्चा रंगवली होती.
नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमार यादवने पाक कर्णधार सलमान अलीशी हस्तांदोलन टाळले होते. त्यानंतर सामना जिंकल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात मिळवला नाही. त्यातून निर्माण झालेल्या वादावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे तक्रार केली होती. अखेरीस सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दिलगिरी व्यक्त केली, तेव्हा वाद निवळला.
दरम्यान, राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या भूमीवर सामने खेळत नाहीत. त्यामुळे सर्व सामने अमिरातीतच खेळवले जात आहेत. २०२७ पर्यंत हा करार कायम राहणार असून दोन्ही देशांतील लढती केवळ तटस्थ स्थळीच होतील.
अफगाणिस्तानचा प्रवास संपला-
डार्क हॉर्स मानल्या गेलेल्या अफगाणिस्तान संघाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. श्रीलंकेने अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात करून गटात अव्वल स्थान मिळवलं. कुशल मेंडिसच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर श्रीलंकेने १८.४ षटकांत विजय मिळवला. अफगाणिस्तानला फक्त हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवता आला.
वेल्लालागे मायदेशी रवाना-
श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागे याच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाल्याने तो तातडीने मायदेशी परतला. तो उर्वरित स्पर्धेत सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद नबीने त्याच्या षटकात पाच षटकार लगावले होते.