(Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मागण्या न मानल्यास “आम्ही ५ कोटी मराठे मुंबईत दाखल होऊ”, असा दम त्यांनी भरला.
जरांगे पाटलांनी सुरू केलेलं कडक उपोषण आता अधिक तीव्र केलं असून त्यांनी पाणीबंद आंदोलन सुरू केलं आहे. “सरकारकडे अजून वेळ आहे, पण जर मागण्या तत्काळ मान्य केल्या नाहीत तर परिस्थिती गंभीर बनेल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या पेचप्रसंगावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “सरसकट आरक्षणावर न्यायालयीन अडचणी आहेत. सरकार हैदराबाद आणि सातारा गॅझेटवर चर्चा करत आहे.”
फडणवीसांवर थेट निशाणा-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे पाटलांनी नेहमीप्रमाणे हल्लाबोल केला. तर फडणवीसांनी प्रत्युत्तर देताना, “सामाजिक काम करताना टीका आणि शिव्या सहन कराव्या लागतात,” असे म्हटले. जरांगे पाटलांची मुख्य मागणी म्हणजे मराठा समाजाला थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं. यावर ओबीसी नेते तीव्र आक्षेप घेत असून त्यांनी सलग बैठकी घेऊन विरोधाची भूमिका स्पष्ट केली आहे.
शाहू महाराज आणि शिंदेंचा पाठींबा-
छत्रपती शाहू महाराजांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा दर्शवला आहे. “सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केलं. तर शशिकांत शिंदे यांनी, “सरकारनं वेळ न दवडता मार्ग काढावा,” अशी मागणी केली.
राजकारणात गहजब-
जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ओबीसींबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं आहे.
आता प्रश्न असा की, सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करणार का? की मधला काही मार्ग शोधला जाणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.