नागपूर विमानतळावर इंडिगो फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग!

02 Sep 2025 14:46:56
- उड्डाणानंतरच पक्ष्याची धडक, सर्व प्रवासी सुरक्षित

IndiGo flight(Image Source-Internet) 
नागपूर :
मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर (Nagpur airport) भीषण अपघात टळला. नागपूरहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या (फ्लाईट क्रमांक 6E…) विमानाला सकाळी ७.०५ वाजता उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच एका पक्ष्याने धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
 
पायलटने तत्परता आणि सूजबूज दाखवत त्वरित कंट्रोल रूमला माहिती दिली आणि विमान सुरक्षितपणे नागपूर विमानतळावर उतरवले. या विमानात एकूण २७२ प्रवासी प्रवास करत होते. त्यात नोकरी करणारे, व्यापारी वर्गातील लोक तसेच सुधाकर कोहळे, शेखर भोयर आणि नितीन कुंभळकर यांसारख्या काही नामवंत व्यक्तींचाही समावेश होता.
 
विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व प्रवासी सुखरूप असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेले नाही. विमानाची तांत्रिक तपासणी झाल्यानंतर प्रवाशांना पुढील कोलकात्याच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
 
लक्षात घेण्यासारखे म्हणजे, नागपूर ते कोलकाता अशी ही एकमेव थेट विमानसेवा असल्याने बहुतांश प्रवासी हाच पर्याय निवडतात. वेळेत घेतलेल्या उपाययोजनांमुळे मोठा अपघात टळल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
Powered By Sangraha 9.0