राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 'या' आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

02 Sep 2025 12:33:17
 
Heavy rains
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात पावसाचा खंड पडलेला असताना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढगांनी पुन्हा हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा (Heavy rains) इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरींचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
 
२ सप्टेंबर रोजी विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातील काही भागांतही पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
 
३ सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर, नाशिक, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि जालना जिल्ह्यांतही पावसाचा जोरदार मारा होण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
४ सप्टेंबरला कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याचे अंदाज व्यक्त केले आहेत. नाशिक, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती येथेही मुसळधार सरींची शक्यता आहे.
 
राज्याच्या इतर भागांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांनुसार आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0