Image Source;(Internet)
नागपूर :
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेवरून एनसीपी (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. त्यांनी पटोले यांना थेट मानसिक संतुलन बिघडल्याची उपमा दिली. “विधानसभा निवडणुकीपूर्वीच स्वतःला मुख्यमंत्री समजून बोलणारे नाना पटोले आता आयोगावर आरोप करून राजकारण करत आहेत,” अशी टीका तटकरे यांनी केली.
राहुल गांधींनी आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांवरही तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. “देशाचे विरोधी पक्षनेते असूनही राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं करतात, हे त्यांच्या अपरिपक्वतेचं लक्षण आहे,” असे तटकरे म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. त्यांनी आरोप केला की, “ऑनलाइन मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गडबड होत असून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल ६,८५० मतं बनावटरीत्या वाढवण्यात आली आहेत.” या मतदारांची वास्तविक माहिती कुठेच उपलब्ध नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
राहुल गांधींच्या या वक्तव्याला पाठिंबा देताना नाना पटोले यांनी म्हटलं की, “देशात बेकायदेशीर प्रकार वाढत असून जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला पाहिजे.”
यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा काँग्रेस विरुद्ध एनसीपी असा सामना पेटला आहे.