राजकीय वातावरण तापलं; पडळकरांच्या वक्तव्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

19 Sep 2025 14:57:23

Gopichand Padalkar Sharad PawarImage Source;(Internet) 
मुंबई :
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली.
 
बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा–
पवार यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अशा प्रकारे व्यक्तींवर एकेरी उल्लेख करून खालच्या पातळीवर टीका करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आटोक्यात आणा.”
 
राष्ट्रवादी पवार गटात यामुळे मोठा आक्रोश असून, ठिकठिकाणी आंदोलने व मोर्चे काढण्याची तयारी सुरू असल्याचे कळते.
 
पडळकरांचं आक्षेपार्ह विधान-
पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांच्या वडिलांचाही अपमान केल्याचा आरोप आहे.
 
“जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही… माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे, ये बघायला, तुझे डोळे दिपून जातील,” अशा शब्दांत पडळकरांनी आक्षेपार्ह विधान केले.
 
राष्ट्रवादीत संताप, सरकारसमोर आव्हान-
पडळकर–पाटील यांच्यातील संघर्ष नवा नाही. दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करत होते. मात्र, यावेळी वापरलेली भाषा अत्यंत खालच्या पातळीची असल्याने राष्ट्रवादी पवार गटातील कार्यकर्त्यांत संताप उफाळून आला आहे. त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या घडामोडीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून, आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0