Image Source;(Internet)
मुंबई:
भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा मैदानावरील कामगिरीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले होते. काही काळापूर्वी ब्रिटिश सिंगर जास्मिन वालियाशी त्याचा संबंध असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. आता सोशल मीडियावर नवीन अफवा जोर धरत आहेत की हार्दिक अभिनेत्री माहिका शर्मा हिला डेट करतोय.
सेल्फी आणि पोस्ट्समुळे वाढली उत्सुकता-
या चर्चेला सुरुवात झाली ती रेडिटवर शेअर झालेल्या एका फोटोमुळे. माहिका शर्माने काढलेल्या सेल्फीत मागे दिसणारी व्यक्ती हार्दिक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याशिवाय तिच्या काही पोस्ट्समध्ये हार्दिकचा जर्सी क्रमांक 33 दिसल्याचा दावा चाहत्यांनी केला.
तसेच दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात, हे लक्षात येताच चाहत्यांनी या चर्चांना आणखी हवा दिली. काहींनी तर वेगवेगळ्या पोस्ट्समध्ये हार्दिक आणि माहिका एकाच स्टाईलचा बाथरोब घालून दिसल्याचं सांगितलं. त्यातच माहिकाचा दुबई प्रवास चर्चेत आला, जिथे हार्दिक सध्या टीम इंडियासोबत स्पर्धेसाठी आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया-
एका चाहत्याने लिहिले – “माहिका कायम क्रिकेटसंबंधित अपडेट्स शेअर करते आणि हार्दिकच्या पोस्ट्सलाही लाईक करते. पण त्यामुळे नातं असल्याचं सिद्ध होत नाही.” तर दुसऱ्याने दावा केला – “मी त्यांना एकत्र पाहिलंय. त्यामुळे या अफवा खरीही असू शकतात.”
म्हणजेच चाहत्यांमध्ये यावरून दोन गट झाले आहेत – काहींना वाटतं हे फक्त योगायोग आहे, तर काहींना खात्री आहे की हार्दिक आणि माहिका रिलेशनशिपमध्ये आहेत.
हार्दिक – नताशाची वेगळी वाटचाल-
हार्दिक आणि नताशा स्टॅन्कोविकचं लग्न 2020 मध्ये कोविड काळात झालं होतं. मात्र, गेल्या वर्षी जुलैमध्ये या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. “चार वर्षांच्या नात्यानंतर स्वतंत्र राहणं दोघांसाठी योग्य ठरेल,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. त्यानंतरपासून हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सतत नवनवीन अफवा रंगत आहेत.