Image Source;(Internet)
मुंबई:
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता या योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई केवायसी (e KYC) करणे बंधनकारक केले आहे. सर्व लाभार्थ्यांनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा सुरु करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, आधार कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण केले जाणार आहे. यामुळे योजना अधिक पारदर्शक व सुरक्षित होईल.
योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे, तसेच त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यास हातभार लावणे हा आहे. पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक मदत दिली जाते.
शासनाच्या नवीन निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षात ई-केवायसी पूर्ण न केल्यास त्या लाभार्थ्या पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरतील. तसेच भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही प्रक्रिया २ महिन्यांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये सांगितले की, ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल.