Image Source;(Internet)
कोल्हापूर :
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का, हा आहे. अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. या भेटीनंतर दोन्ही भावांचे नाते पुन्हा जुळत असल्याचे संकेत मिळाले असून, शिवसैनिकांसाठी तो क्षण भावनिक ठरला. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे ठाकरे बंधू एकत्र लढणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये प्रतिक्रिया दिली. “उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले, तर आम्हाला त्याचे स्वागतच आहे. महाविकास आघाडीला यात कोणतीही हानी होणार नाही. उलट त्यांच्या एकत्र येण्यामुळे विशेषत: मुंबईतील राजकीय समीकरण आमच्या फायद्याचे ठरेल,” असे पवार म्हणाले. त्यांनी सूचकपणे हेही नमूद केले की, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही भाष्य केले. “हैद्राबाद गॅझेट योग्य दिशादर्शक आहे. मी स्वतः त्याची प्रत घेतली आहे. राज्यात सामाजिक सलोखा टिकवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांनी मिळून कटुता कमी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. जातीपातीच्या नावाने गावागावात वाढणारा दुरावा धोकादायक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
तसेच दोन समित्यांबद्दल बोलताना पवार म्हणाले, “विखे पाटील समितीत सर्व समाजांचे प्रतिनिधित्व आहे, पण बावनकुळे समितीत फक्त ओबीसी सदस्य आहेत. यामुळे समाजात आणखी दरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी समन्वय आणि संवाद हाच एकमेव मार्ग आहे,” असे ते म्हणाले.