नागपूर:
जागतिक बाजारात सोनं (Gold) आणि चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून गुंतवणूकदारांसाठी ही दिलासादायक किंवा महत्त्वाची बातमी ठरली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यामुळे सोन्याची किंमत एका दिवसात मोठ्या प्रमाणात चढली, पण लगेचच ती किंमत थोड्या प्रमाणात घसरली.
सोन्याचा ऐतिहासिक रेकॉर्ड-
बुधवारी जागतिक बाजारात 24 कॅरेट सोन्याने $3,707.57/oz या सर्वकालीन उच्चांकाला गाठले होते. मात्र फेडचे अध्यक्ष पॉवेल यांनी केलेल्या विधानानंतर गुरुवारी सोन्याची किंमत $3,690/oz पर्यंत खाली आली. 1980 नंतर सोन्याने इतका उच्चांक गाठल्यामुळे हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. 2025 मध्ये सोन्याच्या किमती 40% ने वाढल्या आहेत, ज्यामुळे S&P 500 सारख्या प्रमुख शेअर इंडेक्सला देखील मागे टाकलं आहे.
आज 17 सप्टेंबरच्या दरम्यान, 24 कॅरेट सोन्याची किंमत 54 रुपयांनी कमी होऊन 11,117 रुपये प्रति ग्रॅम वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोनं 10,190 रुपये, 18 कॅरेट सोनं 8,338 रुपये प्रति ग्रॅम आणि 14 कॅरेट सोनं 64,190 रुपये इतकी आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं 1,09,730 रुपये, तर 22 कॅरेट सोनं 1,00,520 रुपये झाले आहे.
चांदीतही घसरण-
फक्त सोनंच नव्हे, तर चांदीच्या भावातही मोठी घसरण दिसून आली आहे. मागील आठवड्यात 3,000 रुपयांची वाढ झाल्यानंतर 16 सप्टेंबरला 1,000 रुपयांची वाढ नोंदली होती, पण 17 सप्टेंबरला 2,000 रुपयांची घसरण झाली. आज सकाळी आणखी 1,000 रुपयांनी भाव घसरला असून, एक किलो चांदीचा भाव 1,31,000 रुपये झाला आहे. IBJA नुसार, चांदीची किंमत सध्या 1,25,756 रुपये प्रति किलो आहे.
सोनं आणि चांदीमध्ये सध्या असलेला हा बदल गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकतो, त्यामुळे योग्य वेळ निवडून खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.