(Image Source-Internet)
पुणे :
महाराष्ट्रात आरक्षणाच्या (Reservation) मुद्यावरून समाजांत संघर्षाचं चित्र निर्माण झालं आहे. सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करणारा जीआर काढला आहे. या निर्णयाला ओबीसी समाजाचा विरोध असून, मराठा समाजानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. या मागणीला आदिवासी समाजाकडून जोरदार आक्षेप घेतल्याने राज्यात दोन-दोन समाज आमनेसामने आल्याची परिस्थिती आहे.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं. मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्व समाजांना एकत्र बसवलं पाहिजे –
पवार म्हणाले, “आज साजरी करण्याची वेळ असली तरी प्रत्यक्षात समाजात तणाव वाढतो आहे. बंजारा समाजाने मोर्चा काढला, त्यावर आदिवासी समाजाने दुसऱ्याच दिवशी प्रतिकार मोर्चा काढला. या दोन समाजांत कारण नसताना फूट पाडली जात आहे. सरकारने दोन स्वतंत्र समित्या नेमण्याऐवजी एकत्रित समितीत सर्वांचे मत ऐकले पाहिजे. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन सामंजस्याचा मार्ग काढणं अत्यावश्यक आहे.”
शेतकऱ्यांच्या नुकसानीवरही भाष्य-
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पवार यांनी सांगितलं. “सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात रस्त्यावर पाणी साचून वाहिलं, असं दृश्य कधी ऐकलं नव्हतं. पुण्यातील शेतकरीसुद्धा मोठ्या संकटात सापडले आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.