(Image Source-Internet)
मुंबई :
महायुती सरकारची ड्रीम स्कीम ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bhahin Yojana) आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या अनेक महिलांना देखील दरमहा 1500 रुपयांचा भत्ता मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.
महिला व बालविकास विभागाने अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून शासनाकडे पाठवली असली तरी किती महिलांचा समावेश आहे, याची माहिती मुद्दाम लपवली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच या प्रकरणावर शासनाने दबाव टाकल्याची चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना गाजावाजा करत सुरू करण्यात आली. पण तपासणीत चारचाकी वाहने असलेल्या, स्वतःचे घर असलेल्या आणि शासकीय सेवेत कार्यरत महिलांनाही लाभ मिळतोय हे स्पष्ट झाले.
अंगणवाडी सेविकांनी घराघरात जाऊन केलेल्या पडताळणीत हजारो अपात्र लाभार्थी आढळून आले. मात्र या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती बाहेर येत नसल्याने संशयाचे धुके आणखी गडद झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दावा केला की राज्यभर तब्बल २५ लाख महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यांनी सरकारवर पारदर्शकतेच्या अभावाबद्दल तीव्र शब्दांत टीका केली.