राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा; अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत

17 Sep 2025 11:39:57
 
Farmers Financial assistance
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने मदतीचा निर्णय घेतला असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
 
“शेतकरी बांधवांनी धीर धरा, सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली जाणार आहे,” असे आश्वासन भरणे यांनी दिले. त्यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर अनेक भागांतील पंचनामे पूर्ण करून भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रातील पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच त्या शेतकऱ्यांनाही मदत मिळेल.
 
गेल्या दोन महिन्यांत राज्यातील 30 जिल्ह्यांतील 195 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाले आहेत. तब्बल 17 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले असून सोयाबीन, मका, कापूस, डाळी, ऊस, कांदा, भाजीपाला आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नांदेड, यवतमाळ, वाशीम, अकोला, धाराशिव, बुलढाणा, सोलापूर, हिंगोली, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, बीड, लातूर, धुळे, नाशिक, पुणे, नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे.
 
कृषिमंत्र्यांच्या घोषणेमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0