'लाडकी बहीण योजना’तून 1.25 लाखांहून अधिक बहिणी वगळल्या; तुमचं नाव यादीत आहे का तपासा

16 Sep 2025 19:28:43
 
Ladki Bahin Yojana
 (Image Source-Internet)
मुंबई:
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाने (Ladki Bahin Yojana) महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी नवा मार्ग मोकळा करावा, अशी अपेक्षा होती. मात्र आता या योजनेतून राज्यातील सुमारे 1.25 लाख महिलांना अपात्र ठरवलं गेलं आहे. या निर्णयामुळे लाखो लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.
 
अपात्र ठरवण्यामागची कारणे-
योजना सुरू झाल्यानंतर, काही महिलांनी वयाची मर्यादा, घरातील सदस्यसंख्या आणि इतर नियम मोडून अनधिकृत लाभ घेतल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. या नियमभंगाचे निदान करण्यासाठी राज्यभर 6-7 लाख अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षणासाठी तैनात केले गेले. गावोगावी, घराघरात जाऊन अर्जदार महिलांची माहिती गोळा करून अपात्र ठरवण्यात आल्या.
 
पहिल्या टप्प्यात 21 वर्षाखालील आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांचा लाभ तपासण्यात आला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 1,33,335 अर्जांची पडताळणी करण्यात आली, ज्यात 93,007 अर्ज पात्र तर 40,228 अपात्र ठरले.
 
दुसऱ्या टप्प्यात एका घरातील जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ मिळावा हा नियम तपासण्यात आला. 4,09,072 अर्ज तपासले गेले; त्यापैकी 3,24,363 अर्ज पात्र तर 84,709 अपात्र ठरले.
 
अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या-
याच दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून 1,24,937 महिलांना योजनेतून बाहेर ठेवण्यात आले. ही माहिती जिल्हा व महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे यांनी दिली असून, अधिकृत आकडेवारीनुसार ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
 
महिलांकडून संताप-
अपात्र ठरलेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. “आम्हाला योजनेतून वगळण्याची कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही,” अशी तक्रार अनेक महिलांनी केली आहे.
 
अपात्र ठरवण्याची मुख्य कारणे-
वयाची अट मोडणे (21 वर्षांखालील किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त)
बनावट कागदपत्रे किंवा चुकीची माहिती
एका घरातून तीन किंवा अधिक महिलांनी लाभ घेणे
इतर सरकारी योजनांचा लाभ घेतल्यावरही अर्ज करणे
तुमचं नाव अपात्र यादीत आहे का?
महत्वाची माहिती तालुका महिला बालविकास कार्यालयाकडून किंवा aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवरून तपासता येईल. चुकीचे ठरल्यास, महिलांना पुनरपरीक्षणासाठी अर्ज करण्याचा अधिकार दिला गेला आहे, परंतु त्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0