(Image Source-Internet)
नागपूर :
राज्यात कॅन्सरविरोधी धोरण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. त्यांनी नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाचे अपूर्ण असलेले बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. या कामासाठी लागणारा निधी अनुपूरक मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत राज्यातील नागरिकांना दर्जेदार कॅन्सर उपचार सुविधा देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने सर्व जिल्ह्यांमध्ये निदान केंद्रे, डे-केअर सेवा, रेडियोथेरपी व किमोथेरपी युनिट्स सुरू करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
रुग्णांना त्वरित सेवा मिळावी म्हणून लवकरच एल-३ स्तरावरील उपचार केंद्रांसाठी ‘क्लाउड कमांड सेंटर’ उभारण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस राज्य मंत्री माधुरी मिसाल आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांमुळे महाराष्ट्रातील कॅन्सर उपचार यंत्रणा अधिक मजबूत व सर्वसमावेशक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.