शैक्षणिक संस्था स्वायत्त होणार, पण चौकट पाळावी;मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

15 Sep 2025 10:29:09
 
CM Devendra Fadnavis
 (Image Source-Internet)
पुणे :
शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी स्वायत्तता अत्यावश्यक असून तिच्याशिवाय पर्याय नाही. मात्र, स्वायत्ततेचा गैरवापर होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यात कौशल्याधारित दुवा निर्माण झाला, तर देशाला कुशल मनुष्यबळ मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.
 
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार सोहळ्या’त ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपीचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, अध्यक्ष भरत गीते, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, मानद सचिव डॉ. सुजितकुमार परदेशी आणि नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमचे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे उपस्थित होते.
 
या कार्यक्रमात माजी शास्त्रज्ञ वसंथा रामास्वामी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर अभिमान पुरस्कार विलास जावडेकर, डॉ. महांतश हिरेमठ, जयंत इनामदार, उमेश वाघ, तुषार मेहेंदळे आणि श्रावण हर्डीकर यांना प्रदान करण्यात आले. यावेळी नव्या ग्रंथालयाचे व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “संशोधनाला चालना देण्यासाठी स्वातंत्र्याची गरज असते. इंटरनेट आणि संगणक क्रांतीच्या काळात रोजगार संपतील असे वाटले होते, पण त्यातूनच नवे उद्योग व संधी निर्माण झाल्या. आता एआय आणि क्वांटम कॉम्प्युटींगचे युग आहे. भारतीय विद्यार्थी त्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या बळावर या नव्या आव्हानालाही समर्थपणे सामोरे जातील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0