तब्बल १४ वर्षे अंधारात,मला संपवायचा प्रयत्न झाला;अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

15 Sep 2025 11:20:39
 
Ashok Chavan
 (Image Source-Internet)
लातूर :
माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या राजकीय आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. लातूरमधील सभेत बोलताना त्यांनी सांगितले, “मी तब्बल १४ वर्षे राजकीय अंधारात होतो. मला संपवण्यासाठी कट रचला गेला होता. अशा वेळी मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”
 
चव्हाण यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. “लातूरमध्ये सहापैकी पाच जागांवर महायुतीचा विजय हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा परिपाक आहे,” असे ते म्हणाले. तसेच, “जसे मी काँग्रेससाठी काम केले तसेच आता भाजपसाठीही प्रामाणिकपणे मेहनत घेणार आहे. मोदीजी आणि फडणवीस साहेबांशी चर्चा करूनच हा मार्ग स्वीकारला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
नांदेडमधील निकालांचा उल्लेख करत ते म्हणाले, “एकजूट ठेवल्यास यश नक्की मिळते. आम्ही नऊपैकी नऊ जागा जिंकून दाखवल्या. मतदार योग्य उमेदवारांना पाठिंबा देतात.”
 
सभेत त्यांनी विरोधकांचीही कडाडून टीका केली. “उपराष्ट्रपती निवडणुकीतच विरोधकांची एकता ढासळली. लोकांना दिशा आणि विकास देण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जनता भाजपसोबत चालली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
चव्हाण यांनी पाशा पटेल महायुतीसोबत आल्याचेही सांगितले आणि बदलत्या समीकरणांवर प्रकाश टाकला. शेवटी, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि नरेंद्र मोदींचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा होत असल्याची आठवण करून देत “मोदीजींचे कार्य घरोघरी पोहोचवा” असे आवाहन करत त्यांनी आपले भाषण संपवले.
Powered By Sangraha 9.0