देशभक्ती की व्यापार? भारत-पाक सामन्यावरून उद्धव ठाकरे यांचा भाजपावर जोरदार हल्ला

13 Sep 2025 15:10:59
 
Uddhav Thackeray
 (Image Source:Internet)
मुंबई :
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर तीव्र निशाणा साधला आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा करून व्यापार साधणे असल्याचा त्यांचा आरोप आहे. “सीमेवर जवान शहीद होत असताना सामन्यातून पैसा कमवणे लाजिरवाणे आहे. खून आणि क्रिकेट एकत्र कसे येऊ शकतात?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
 
मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केले की, शिवसेनेच्या वतीने भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध करण्यात येत असून राज्यभर ‘हर घर से सिंदूर’ मोहिम राबवून महिलांकडून सिंदूर जमा करून पंतप्रधान कार्यालयाला पाठवला जाणार आहे.
 
ठाकरे म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले, पण आता त्याच पाकिस्तानसोबत सामना खेळून पैसा कमवणे हे देशभक्तीला काळिमा फासणारे आहे. मोदी सरकारने स्पष्टपणे जाहीर करावे की आपण पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही.
 
भाजपावर आणखी हल्ला करताना त्यांनी म्हटले, बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानविरोधात ठाम भूमिका घेतली होती. आज मात्र हेच नेते नवाज शरीफांच्या वाढदिवसाला केक खायला जातात. देशभक्तीचा व्यापार आम्हाला चालणार नाही.
Powered By Sangraha 9.0