ओबीसी आरक्षण सुरक्षित राहील; लातूर शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर अजित पवारांचे आश्वासन

13 Sep 2025 11:53:30
 
Ajit Pawar
 (Image Source:Internet)
मुंबई :
मराठा-ओबीसी (OBC) आरक्षणाच्या वादळात लातूर जिल्ह्यात घडलेली एका शेतकऱ्याची आत्महत्या राज्यभर अस्वस्थतेचं कारण ठरली आहे. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेवराव कराड (३५) यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात येईल या भीतीतून मांजरा नदीपात्रात उडी घेतली. त्यांच्या मृत्यूनंतर ओबीसी समाजात संतापाचा उद्रेक झाला असून सरकारवर दबाव वाढत आहे.
 
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्य सरकार सर्व घटकांचा न्याय राखणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कोणतीही धक्का पोहोचणार नाही. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून देताना ओबीसींचे हक्क अबाधित राहतील,” अशी हमी त्यांनी दिली. तसेच, नागरिकांनी संयम पाळून टोकाचा मार्ग अवलंबू नये, असेही आवाहन केले.
 
कराड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत “माझ्या कुटुंबाला व ओबीसी समाजाला न्याय मिळावा” असे नमूद केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात नवे राजकीय वातावरण निर्माण झाले असून ओबीसी संघटनांनी सरकारकडून ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0